डीजे वाजवाल तर थेट गुन्हे दाखल !

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)  :  गणेशोत्सव, नवरात्रीत डीजे वाजला नाही, त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावा यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पुन्हा पुढाकार घेतला आहे. मंगळवारी (दि.१७) आयुक्तालयात डीजे चालक-मालक आणि ऑपरेटरची बैठक घेऊन कडक शब्दांत तंबी दिली. शहरात कोणत्याही परिस्थितीत डीजे वाजवण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणीही डीजे वाजवला तर थेट गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी बैठकीत बजावले.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी ध्वनिप्रदूषण कायद्याची माहिती संबंधितांना दिली. 
उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारची अवहेलना होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या बैठकीला ५५ डीजे चालक-मालक आणि ऑपरेटर उपस्थित होते. बैठकीत सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले.